सार्वजनिक आरोग्य

एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

सुधारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची राज्यात एकत्रित अमंलबजावाणी करण्याकरिता ई-निविदा पध्दतीने मे. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी लि. या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदर कंपनीसोबत सामंजस्य करारनामा करण्यात आला असून दि.01.04.2020 पासून सुधारित योजना राज्यात लागू करण्यात आली आहे.

एकत्रित योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1000 इतकी आहे. या योजनेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ९९६ उपचार असून प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १२०९ उपचार आहेत.

युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान-भारत प्रधान मंत्री जन अरोग्य योजनेमध्ये 2,22,08,948 इतकी लाभार्थी कुटुंब संख्या आहे. सदर दोन्ही योजना एकत्रित राबविल्या जात असल्या तरी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन अरोग्य योजनेसाठी (40 टक्के) राज्य शासनाकडुन लेखाशिर्ष निहाय अनुदान अर्थसंकल्पीत करण्यात येते व राज्य शासनाच्या 40 टक्के हिश्यानुसार केंद्र शासनाकडुन 60 टक्के अनुदान प्राप्त होते.

(1) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील गट-अ लाभार्थ्यांच्या विमा संरक्षणासाठी युनायटेड इंडिया कंपनीस विमा हप्ता अदा करण्यात येत आहे. कंपनीसोबतच्या करारनाम्यात नमूद केल्यानुसार माहे सप्टेंबर 2019 अखेर पिवळी,केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांची एकूण संख्या 2,22,08,948 (गट-अ लाभार्थी गट) इतकी आहे. एकूण 2,22,08,948 विमाधारक लाभार्थी कुटुंबांपैकी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची 93,05,910 इतकी लाभार्थी कुटुंबे वगळता उर्वरीत 1,29,03,038 इतक्या लाभार्थी कुटुंबे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची लाभार्थी आहेत.

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी अनुसुचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या 9% इतकी असल्याने उर्वरीत लोकसंख्येचा सर्वसाधारण प्रवर्गात समावेश होतो. त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या 1,29,03,038 लाभार्थी कुटुंबांपैकी 11,61,273 (9%) इतकी कुटुंबे अनुसुचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट आहेत.

(2) आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत यापूर्वी 83,63,664 लाभार्थी कुटुंबे होती. पंरतू राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या दिनांक 12/01/2023 रोजीच्या अर्धशासकीय पत्राद्वारे 93,05,910 इतकी लाभार्थी कुटुंब संख्या महाराष्ट्रराज्यात निश्चित करण्यात आली असून पैकी 8,37,532 कुटुंबे (09.00%) अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहेत.

विमा हप्ता प्रदानासाठी

एकत्रित योजनेतील लाभार्थी कुटुंबांना रु.1.5 लक्ष रकमेपर्यंतचे विमा संरक्षण कवच देण्यासाठी सांमजस्य करारनाम्यातील कलम क्र. 8 व 16 नुसार युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीस प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. 797/- इतका देय होता. परंतू युनायटेड इंडिया इंन्श्युरन्स कंपनीचा करार दिनांक 31/03/2023 रोजी संपुष्टात आल्यामुळे एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या दि.13/04/2023 रोजीच्या नियामक परिषदेच्या सभेमधील विषय क्र.3 नुसार युनायटेड इंडिया इंन्श्युरन्स कंपनीला 2023-24 वित्तीय वर्षामध्ये 31/03/2024 पर्यंत मुदतवाढ दिली असून विमा हप्ता दर प्रति कुटूंब प्रतिवर्ष रु.797/- वरुन रु.855/- इतका निश्चीत करण्यात आला आहे.