आदिवासींच्या शैक्षणिक विकासाकरीता कार्यरत असलेल्या स्वेच्छा संस्थामार्फत स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळांना 1953-54 पासून अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
राज्यातील स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांकरीता खालील चार प्रकारे अनुदान देण्यात येते.
- वेतन अनुदान:- अनुदानित आश्रशाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते इत्यादी साठी वेतन अनुदान देण्यात येते.
- परिपोषण अनुदान:- अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार व भोजनासाठी परिपोषण अनुदान देण्यात येते. सदर अनुदान प्रति विद्यार्थी प्रति माह रुपये 1500/- प्रमाणे देण्यात येते.
- आकस्मिक अनुदान:- अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अंथरुण-पांघरुण, गणवेश, स्टेशनरी, लेखनसामुग्री इत्यादी तसेच शालेय व्यवस्थापनासाठी स्टेशनरी, कार्यालयीन खर्च, इमारत रंगरंगोटी दुरुस्ती इत्यादींसाठी आकस्मिक अनुदान देण्यात येते. आकस्मिक अनुदान हे प्राथमिक विभागासाठी आश्रमशाळा व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या 8 टक्के व माध्यमिक विभागासाठी आश्रमशाळा विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या 12 टक्के व वसतीगृह विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाच्या 8 टक्के प्रमाणे देण्यात येते.
- इमारत भाडे अनुदान:-ज्या स्वंयसेवी संस्थानी आश्रमशाळांसाठी इमारीत भाडेतत्वावर घेतल्या आहेत, अशा संस्थांना देय इमारत भाडयाच्या 75 टक्के इतके इमारत भाडे देण्यात येते.
आरोग्य सुविधा-
अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी फिरत्या वैद्यकीय पथकांमार्फत वेळोवेळी करण्यात येते. या बाबतची नोंद हेल्थ कार्ड मधून शाळांमध्ये ठेवण्यात येते. आजारी विद्यार्थ्यांकरिता शाळेजवळील ग्रामीण रुग्णालये, सामान्य रुग्णालये, यामधून उपचार करण्यात येतात काही अडचण भासल्यास त्या त्या विभागातील प्रकल्प अधिकारी हे याबाबत संबंधितास वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
सोई-सुविधा-
अनुदानित आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास वर्षातुन एकदा गणवेषाचे दोन जोड व तीन वर्षातून एकदा आंथरुण पांघरुण व भांडी (ताट, वाटी व पेला) पुरविणे. संस्थेवर बंधनकारक करण्यात आलेले आहे. स्वयंसेवी संस्थांना दिल्या जाणाऱ्या परिरक्षण अनुदानातून विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था, निवासाची सोय, गणवेश पाठयपुस्तके, वहया व लेखनसाहित्य या बाबी मोफत पुरविल्या जातात. बहिस्थ विद्यार्थ्यांना शिक्षण व्यतिरिक्त अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. तर आकस्मिक खर्चातून कार्यालयीन खर्च, फर्नीचर, साधनसामुग्री, इमारत दुरुस्ती, विद्युत देयके, पाठयपुस्तके, शालेय साहित्य, प्रथमोपचाराचा खर्च इत्यादी बाबींवरील खर्च भागविण्यात येतो.
आश्रमशाळांचे कामकाज आश्रमशाळा संहितेमध्ये केलेल्या तरतूदीनुसार चालविण्यात येते.
अनुदानित आश्रमशाळेस मान्यतेकरीता अटी:-
- संस्था नोंदणीकृत असली पाहिजे.
- विहित नमुन्यात आश्रमशाळा सुरु करण्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण, उपलब्ध विद्यार्थी संख्या, संस्थेची आर्थिक स्थिती, आदिवासी क्षेत्रातील कार्य इ.च्या माहितीसह अर्ज करणे आवश्यक आहे.
संपर्क:- संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.